सुस्वागतम्

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

राहुल गांधी यांस अनावृत्त पत्र

       राहुल बाळा, तू वयाची चाळीशी गाठलीस पण तुझा बालपणीचा अल्लडपणा अजून गेलेला दिसत नाही. अन्यथा एखाद्या परदेशी राजदुतासमोर तू आपल्याच देशबांधवांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यांच्यावर आरोपांची चिखलफेक केली नसतीस. मागे तू म्हणे भारताचा ‘शोध’ घेण्यासाठी देशभर हिंडलास. इतकेच नव्हे तर दलिताच्या घरी जेवून, तू बातमीसाठी हपापलेल्या आणि सतत कुत्र्याप्रमाणे तुझ्या अवती-भवती फिरणाऱ्या पत्रकारांना ‘ब्रेकिंग न्यूज’ दिलीस. अगदी काही दिवसांपूर्वी तू सुद्धा देशातील ‘सर्वसामान्य’ लोकांप्रमाणेच ट्रेन मधून प्रवास केल्याचे कळते. अरे मग एवढे फार्स करून सुद्धा तुला आपला देश, इकडची संस्कृती कळली नाही का?  

   

        तुझे खापरपणजोबा मोतीलाल नेहरू हे तत्कालीन काँग्रेसमधले वजनदार आणि प्रगल्भ नेतृत्व समजले जाई. त्यांचा वारसा उचलणारे तुझे पणजोबा आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी उच्चशिक्षण घेतले ते विदेशातच. त्यानंतर क्रमश: तुझी आजी इंदिरा गांधी, तुझे वडील आणि काका, राजीव व संजय गांधी यांच्यावर सुद्धा भारतीय संस्कृती आणि शिक्षणपद्धतीपेक्षा पाश्चात्य विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. तुझ्या मातोश्री आणि तुम्ही दोघेही भावंड यांना ‘भारतीय’ म्हणावे का, असा प्रश्न आम्हाला सुरवातीला पडलेला. 

       मग हळुहळू वाटायला लागल की, जरी तुम्ही परदेशी असलात तरी भारतीय मूल्यांचा तुमच्यावर सुद्धा प्रभाव पडला आहे. अरे खरचं.....!!!  अस कर ना, तू तुझ्या पणजोबांनी लिहिलेले ‘भारताचा शोध’ हे पुस्तक वाच. त्यांनी शक, हूण, कुशाण इथपासून मुघल राजा अकबर या सर्व बुभुक्षित विदेशी आक्रमकांचे भारतीय तत्त्वज्ञानामुळे झालेले हृदयपरिवर्तन मोठ्या गौरवाने लिहिले आहे. हे वाचताना कदाचित तुझी नजर नेहरूंनी केलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावर जाईल. पण शिवाजी महाराजांचा तुझ्या आजोबांनी ‘वाट चुकलेला देशभक्त’, असा उल्लेख हा केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ आहे, असे समजून तू तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करशील याची खात्री मला आहेच. 

अरे मुद्दा भरकटलो बघ..!! थोडक्यात काय तर असा आमचा देश. आता तुच त्याला आपला मानतोस की काय, ते मला माहीत नाही. पण तुझा गृहपाठ खूपचं कच्चा असल्याचे जाणवले. हिंदू सहनशील वगैरे आहेत खरे, पण त्यांचे मर्दानी रूप मुघल आणि इंग्रजांनी अनुभवले आहे. आम्ही शूर असलो तरी क्रूर नाही बर का? मग आम्ही आमच्याच देशात बॉम्बस्फोट घडवू, असा जावईशोध तुला कसा लागला बरे? भारत भ्रमण करताना एखादा बॉम्बनिर्मिती कारखाना तर नाही ना पाहिलास?

        अरे १९४७ सालापासून आजगायत आमच्या देशावर भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या अब्रुची लक्तरे आत्ता कुठे जागतिक वेशीवर टांगली जात असताना तू हिंदुंना आणि पर्यायाने समस्त भारतीयांनाच अतिरेकी कसे ठरवू शकलास? आम्ही ज्या भगव्या ध्वजाची शान मिरवतो ना, तो ध्वज अशी पुचाट कृत्य करण्याची बुद्धी आम्हाला कधीच देणार नाही. राहता राहिला प्रश्न तुझ्या वक्तव्यांचा. त्यावर तू महात्मा गांधींचे विचार नक्की वाच. तू आमूलाग्र बदलशील.

        हिंदू संस्कृती, परंपरा आणि हिंदू मन यांचा नेमका अर्थ तुला जेव्हा कळेल, तेव्हाच तू राजकारण करू शकशील. त्यासाठी तू इथल्या जनतेशी, त्यांच्या भावविश्वाशी आणि समस्यांशी समरसून जायला हवे. तरच कदाचित तुला राजकीय परिपक्वता येईल.  

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

आपले म्हणणे बरोबर आहे, राजकीय नेत्याने अश्या प्रकारची विधाने करायची नसतात.

Pranav Bhonde म्हणाले...

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा || धृ. ||

शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी !!! || १ ||

कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्ण कारणी क्षणही न रणी धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला
जणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा ठेला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी मलीन मृत्तिका लव न धरी
नभराजाचा गर्व हरी ... || २ ||

मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची
झुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामी भक्ती चे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे हे नंदनवन देवांचे
मूर्तीमंत हा हरी नाचे ... || ३ ||

स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती
नसूनी असणे मरूनी जगणे राख होउनी पालविणे
जीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नव विश्व उठे ... || ४ ||

या झेंड्याचे हे आवाहन महादेव हरहर बोला


उठा मराठे अंधारावर घाव निशणीचा घाला
वीज कडाडुनी पडता भुईवर कंपित हृदयांतरी होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत
कर्तृत्वाचा द्या हात ... || ५ ||


कविवर्य वि. स. खांडेकर यांनी हिंदुंच्या अस्मितेचे आणि स्वभावधर्माचे यथार्थ वर्णन या गीतात केले आहे. देशाच्या युवराजांना या गीताचा अर्थ कळला असता तर...................................... :-(